भारतीयांचा चिनी दृष्टिकोन

 

चीन हा आपला बलाढय़ शेजारी. त्याच्या चाली ओळखण्यासाठी महत्त्वाची माहिती आणि विश्लेषण वाचकांपुढे आणणारं हे नवं पाक्षिक सदर..
संपन्न आणि सामथ्र्यशाली चीन ही अलीकडच्या काळातील घटना असली तरी शेजारधर्मानुसार भारताने या देशाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले आहे. भारतात २०व्या शतकाच्या मध्यापासून ते आजतागायत चीनबाबत मुख्यत: चार विचारप्रवाह बघावयास मिळतात. यापकी विशिष्ट कालावधीत कोणता तरी एक प्रवाह प्रसंगानुरूप इतरांवर वरचढ ठरत आला आहे.
२१व्या शतकाच्या सुरुवातीपासून चीनने आर्थिक सामर्थ्यांच्या बळावर जगभरातील तज्ज्ञांना चक्रावून सोडले आहे. चीनच्या उदयाने भारतातील जनसामान्यांच्या भुवयासुद्धा उंचावल्या आहेत. भारतात असा सर्वसामान्य समज रूढ झाला होता की, महाकाय आकार आणि प्रचंड लोकसंख्या यामुळे देशाच्या आíथक विकासाला हवी तशी गती मिळू शकलेली नाही. पण चीनमधील स्थर्य आणि विकास बघताना हा समज आपोआप मागे पडू लागला आहे. जागतिक पटलावर महासत्तेचे रूप घेऊ पाहणाऱ्या देशाचा इतरांवर कसा प्रभाव पडतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. संपन्न आणि सामथ्र्यशाली चीन ही अलीकडच्या काळातील घटना असली तरी शेजारधर्मानुसार भारताने या देशाला सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले आहे. भारतात २०व्या शतकाच्या मध्यापासून ते आजतागायत चीनबाबत मुख्यत: चार विचारप्रवाह बघावयास मिळतात. यापकी विशिष्ट कालावधीत कोणता तरी एक प्रवाह प्रसंगानुरूप इतरांवर वरचढ ठरत आला आहे.
प्राचीन मित्र, अर्वाचीन समधारक
भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतींमधील देवाणघेवाण सर्वश्रुत आहे. आधुनिक काळात ही मत्री जोपासणे दोन्ही देशांचे नसíगक कर्तव्य असून पाश्चिमात्य वर्चस्वाला छेद देण्याचे काम दोन्ही देश एकत्रितपणे करू शकतात अशी धारणा २०व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झाली. ७ सप्टेंबर १९४६ रोजी केलेल्या रेडिओ भाषणात जवाहरलाल नेहरू यांनी ही भूमिका पुढील शब्दांत मांडली- ‘‘चीन, बलशाली भूतकाळ लाभलेला बलशाली देश आणि आपला शेजारी, हा सदैव भारताचा मित्र राहिला आहे आणि ही मत्री येत्या काळात वृिद्धगत होईल. आम्ही अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो की, या देशातील सध्याच्या समस्या लवकर संपतील आणि एक अखंड व लोकशाहीवादी चीन उदयास येईल, जो जागतिक शांती आणि विकासाच्या प्रक्रियेत भरीव योगदान देईल.’’ या काळात चीनमध्ये सत्ताधारी के.एम.टी. आणि क्रांतिकारी साम्यवादी पक्ष यांच्यात यादवी माजली होती. भारतीय नेत्यांचे सत्ताधारी पक्षाशी मित्रत्वाचे संबंध होते. ज्याप्रमाणे अमेरिकेसारख्या महासत्ता चीनमध्ये वाहत असलेल्या वाऱ्यांबाबत अनभिज्ञ होत्या त्याचप्रमाणे भारतीय नेत्यांनासुद्धा काळाची पावले ओळखता आली नव्हती. १ ऑक्टोबर १९४९ रोजी माओ त्से तुंगच्या नेतृत्वात चीनच्या साम्यवादी पक्षाने ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ची स्थापना केली आणि के.एम.टी.च्या नेत्यांना तवान बेटावर पळ काढावा लागला. यानंतर सन १९५१ मध्ये लंडनहून केलेल्या रेडिओ भाषणात नेहरू म्हणाले होते की, ‘‘चीनने एक नवे रूप घेतले आहे. या रूपाशी आपण सहमत असू किंवा नसू, पण एका महान देशाचा पुनर्जन्म झाल्याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल.. या नव्या रूपातील चीनचे वागणे काही वेळा खूप खटकते. पण आपल्याला चीन आणि इतर आशियाई देशांचा ताजा इतिहास ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.. भारताची चीनशी २००० वर्षांपासूनची मित्रता आहे. आमचे काही मतभेद आणि छोटे-छोटे संघर्षसुद्धा आहेत. पण भूतकाळ आम्हाला प्रेरणा देतो आणि आशियातील शांतीसाठी मित्रत्वाचे संबंध जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’ चीनमध्ये मोठा बदल घडल्याची नोंद जरी नेहरूंनी घेतली होती तरी व्यवस्थेतील आमूलाग्र परिवर्तन त्यांच्या लक्षात आले नव्हते. तसे ते कोणालाच नीट कळले नव्हते. चीनच्या साम्यवादी पक्षाला स्वर्णिम इतिहासात स्वारस्य नव्हते, तर वसाहतवादी व भांडवलशाही देशांपासून स्वत:चे रक्षण करायचे होते. भांडवलशाही विरुद्ध वर्ग-संघर्ष नाकारणारे भारतासारखे देश चीनच्या लेखी ‘वसाहतवाद्यांचे पाळीव कुत्रे’ होते. नव्या चीनची मानसिकता कळू लागल्यानंतर आणि १९६२च्या युद्धानंतर, चीनबाबतचा पहिला मतप्रवाह मागे पडला आणि दुसरा मतप्रवाह वरचढ झाला.
अतक्र्य स्पर्धक, घातक शत्रू
एकीकडे ‘िहदी-चिनी भाई-भाई’ नारा द्यायचा आणि दुसरीकडे सुनियोजित आक्रमण करायचे हे विश्वासघातकी देशाचे लक्षण आहे असे बहुमत १९६२च्या युद्धानंतर भारतात तयार झाले. खरे तर सन १९५०-५१ मध्ये चीनच्या लाल सेनेने तिबेटवर वर्चस्व प्रस्थापित केल्यापासून, वल्लभभाई पटेल, राम मनोहर लोहिया आणि उजव्या राजकीय नेत्यांनी चीनपासून धोका असल्याचे अधोरेखित केले होते. नेहरूंच्या १९५१च्या वर उल्लेखलेल्या भाषणात या मतप्रवाहाचा प्रभाव दिसून येतो. चीनच्या आंतरराष्ट्रीय वागणुकीबाबत तर्क लावणे अशक्य असल्याचे सन १९५०-५३च्या कोरियन युद्धात सर्वप्रथम दिसून आले. नव्याने स्थापन झालेली आणि असंख्य अंतर्गत समस्यांना तोंड देणारी राज्यसंस्था शेजारी मित्र देशासाठी सर्वस्व झोकून देईल अशी कल्पनाही अमेरिकेने कोरियन युद्धाच्या वेळी केली नव्हती. पुढे अगदी याउलट, दोन दशके अमेरिकेशी टोकाचे शत्रुत्व पत्करल्यानंतर त्याच देशाशी सोविएत संघाविरुद्ध अलिखित आघाडी करण्याचे धारिष्टय़ चीनने केले.
पाकिस्तान आणि उत्तर कोरियाने चीनच्या वरदहस्तात अण्वस्त्र क्षमता विकसित केली हे खुले रहस्य आहे. चीनची ही वर्तणूक आंतरराष्ट्रीय संबंधांतील सर्व नियम आणि धारणांना तडा देणारी आहे. जगातील दुसऱ्या कोणत्याच अण्वस्त्रधारी राष्ट्राने आपल्या मित्र देशांची अण्वस्त्र क्षमता विकसित करण्यात मदत केलेली नाही. अगदी अमेरिकेने ग्रेट ब्रिटनने अण्वस्त्रे बाळगू नयेत म्हणून अतोनात प्रयत्न केले होते. चीनच्या जगावेगळ्या वागण्याने केवळ भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये चीनवर कदापि विश्वास ठेवू नये ही धारणा प्रबळ आहे.
गूढ आणि चाचपणी करण्यास कठीण
चीनमध्ये साम्यवादी पक्षाला यश कसे प्राप्त झाले हे कोडे ज्याप्रमाणे अनेक वष्रे अनेकांना सतावत होते त्याचप्रमाणे साम्यवादी पक्षाच्या एकछत्री राजवटीला कधीच मोठे आव्हान (तियानमेनचा प्रसंग वगळता) का मिळाले नाही हे गूढ उकलता उकलत नाही. चीनमध्ये निर्णय आणि अंमलबजावणी प्रक्रिया कशी राबवली जाते, समाज आणि राज्यसंस्था यांच्यात काय नाते आहे, राज्यकर्त्यांना स्वीकारार्हता कुठून प्राप्त होते, इत्यादी ठोस उत्तरे नसलेल्या बाबींमुळे चीन रहस्यमय होत जातो. सोविएत संघात साम्यवादी राजवटीची सद्दी संपली तेव्हापासून साम्यवादी चीनच्या पाडावाची सर्व गृहीतके चुकीची का ठरलीत? दक्षिण कोरिया अथवा तवानप्रमाणे आíथक सुधारणांमुळे ‘निवडणुकींची लोकशाही’ चीनमध्येसुद्धा अवतरेल ही शक्यता फोल का ठरली? अशा अनुत्तरित प्रश्नांमुळे चीनचे गूढ कायम राहते. हे गूढ उकलण्याचे प्रयत्न करण्याऐवजी गूढ चीनबद्दल भीतीयुक्त कुतूहल बाळगण्यात धन्यता मानणारा तिसरा प्रवाह भारतात मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहे.
अनुकरणीय
प्रत्यक्षात समानतेवर आधारित समाज स्थापण्यात यशस्वी झालेला देश म्हणून माओच्या चीनने जसा युरोपसह अनेक देशांतील युवकांवर प्रभाव टाकला होता तशीच भुरळ भारतातील नक्षलवादी आंदोलनातील अनेकांना पडली होती. भारताने चीनचे अनुकरण करावे असा आग्रह धरणाऱ्या या मंडळींमधून काहींची मजल ‘चिनी मार्ग आमचा मार्ग, चिनी अध्यक्ष आमचा अध्यक्ष’ म्हणण्यापर्यंत गेली होती. आज परिस्थिती विलक्षण बदलली आहे. चीन हा डाव्यांपेक्षा उजव्यांना अधिक अनुकरणीय वाटू लागला आहे. शहरांमधील झगमगाटयुक्त शिस्त, लष्करी सामथ्र्य, तिबेट व िशशियांग प्रांतांतील विघटनकारी शक्तींविरुद्धचे दडपशाही तंत्र, एकपक्षीय अधिकारशाही, पाश्चिमात्य देशांना नकार देऊ शकणारी राजकीय इच्छाशक्ती ही चिनी वैशिष्टय़े बघता भारत हे सर्व का करू शकत नाही, हा प्रश्न विचारण्यात येतो. या प्रश्नाच्या उत्तरात हेच निहीत असते की भारताने प्रगतीचा चिनी मार्ग अवलंबायला हवा.
वर नमूद केलेल्या चारही विचारप्रवाहांमध्ये तथ्य आहे आणि त्यांच्यातील विचार-कलहातून चीन अधिक स्पष्ट समजून घेण्याचा मार्ग तयार होण्याची अपेक्षा आहे.
परिमल माया सुधाकर
January 12, 2016

Read this article published in Loksatta on January 12, 2016

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger