तियानमेनचा धाक आणि प्रतिधाक

 

४ जून १९८९ च्या काळरात्री बीजिंगमधील तियानमेन या मुख्य चौकातील तरुण आंदोलकांवर सरकारने लष्करी कारवाई केली होती, हे सर्वज्ञात आहे. चीनमधील काही उद्योजकांनी ‘४ जून’ या नावाने नवीन बीयर बाजारात आणताच सरकारी यंत्रणेने त्यावर तात्काळ बंदी घालून उद्योजकांचीच चौकशी सुरू केली..
गेल्या महिन्यात चीनमध्ये काही उद्योजक तरुणांनी ‘४ जून’ या नावाने नवी बीयर बाजारपेठेत आणली. सरकारी यंत्रणेला याचा सुगावा लागताच सर्वोच्च नेतृत्वापर्यंत सर्व चक्रे फिरली. तात्काळ या बीयरच्या उत्पादनावर बंदी आली आणि संबंधित उद्योजकांची कसून चौकशी सुरू झाली. साहजिकच सरकारचा आक्षेप बीयरच्या उत्पादनावर किंवा त्याच्या गुणवत्तेवर नव्हता तर नावावर होता. चीनमध्ये ‘नावात काय आहे?’ असे सहसा कुणी म्हणणार नाही. नावांमधून राजकीय संदेश प्रसारित होतात याची चीनच्या साम्यवादी पक्षाला आणि जनतेला चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे संस्था, उत्पादन, शहर, योजना इत्यादींचे राजकारण व राजकारण्यांशी संबंधित नामकरण करण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. या पाश्र्वभूमीवर बीयरला ‘४ जून’ हे नाव देणे अत्यंत धाडसाचे कार्य होते. हे नाव देण्यामागील उत्साही उद्योजकांचा मनसुबा अद्याप स्पष्ट झाला नसला तरी सरकारला हे नाव का अमान्य आहे हे चीनमधील शेंबडे पोरदेखील सांगेल. ४ जून १९८९ च्या काळरात्री राजधानीतील तियानमेन या मुख्य व भव्य चौकातील तरुण आंदोलकांवर सरकारने लष्करी कारवाई केली होती. मागील आठवडय़ात या घटनेला २७ वष्रे पूर्ण झाली, मात्र लष्करी कारवाईचा जनतेतील धाक आणि अशा प्रकारच्या आंदोलनाचा सरकारला असलेला प्रतिधाक अद्याप कायम आहे.
चीनमध्ये सरकारी भाषेत या कारवाईचे वर्णन ‘४ जूनची घटना’ असे करण्यात येते. यामागे दोन कारणे आहेत. एक, चीनच्या आधुनिक इतिहासातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनांच्या केंद्रस्थानी तियानमेन चौक होता. सन १९८९ पूर्वी चीनमधील साम्यवादी तसेच उदारमतवादी या दोन्ही गटांसाठी तियानमेन चौक हा पुरोगामी इतिहासाचा अविभाज्य भाग होता. सन १९१९ मधील तरुणांच्या ज्या ‘मे आंदोलनाने’ नव्या विचारांचे साम्राज्यवादविरोधी वारे संपूर्ण चीनमध्ये पसरवले त्याचे मुख्य स्थान तियानमेन होते. सन १९७६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान चाऊ-एन-लाईच्या निधनानंतर जनतेने प्रचंड संख्येने तियानमेन चौकात हजेरी लावत त्यांना शांततापूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. हा प्रकार म्हणजे सांस्कृतिक क्रांतीला कंटाळलेल्या चीनच्या जनतेने उत्स्फूर्तपणे केलेली ‘गांधीगिरी’ होती. या शांततापूर्ण श्रद्धांजली प्रदर्शनानंतर डेंग शिओिपगचे राष्ट्रीय राजकारणात दमदार पुनरागमन झाले होते. एका अर्थाने चीनच्या आíथक सुधारणांची आणि आधुनिकीकरणाची राजकीय प्रक्रिया चाऊ-एन-लाईला वाहिलेल्या श्रद्धांजलीतून सुरू झाली होती. सन १९१९ आणि सन १९७६ मधील घटनांकडे चीनचा साम्यवादी पक्ष पुरोगामी लोककेंद्रित आंदोलनाच्या चष्म्यातून बघतो, तर सन १९८९ मधील विद्यार्थी आंदोलनाला प्रतिगामी मानण्यात येते. त्या आंदोलनाचा तियानमेनच्या गौरवशाली परंपरेशी संबंध जोडला जाऊ नये यासाठी त्याचे वर्णन फक्त ‘४ जूनची घटना’ असे करण्यात येते. यामागील दुसरे कारण म्हणजे, ४ जून १९८९ ला जे काही घडले ती केवळ एक ‘घटना’ होती आणि तो सरकारविरुद्धचा उठाव वगरे नव्हता हे ठसवण्याचा साम्यवादी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन संपवण्यासाठी सरकारने लष्कराची आणि तेसुद्धा रणगाडय़ांची, मदत घेतली याचे खंडन साम्यवादी पक्षाने कधी केले नाही. मात्र ४ जूनच्या रात्री तियानमेनमध्ये भयंकर रक्तपात घडल्याच्या बातम्या पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी हेतुपूर्वक पसरवल्याचे साम्यवादी पक्षाचे ठाम मत आहे. असे असले तरी, सन १९८९ च्या मे-जून महिन्यांत तियानमेन चौकात मोठे राजकीय नाटय़ घडले हे वास्तव आहे. तियानमेन घटनेनंतर चीनची वाटचाल सोविएत संघाची ज्याप्रमाणे अधोगती झाली त्या दिशेने होत असल्याचे भाकीत तत्कालीन जागतिक परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. मात्र असे घडले नाही. याउलट, साम्यवादी पक्षाची चीनच्या राजकीय व्यवस्थेवरील पकड अधिकच मजबूत झाली आणि चीनने आíथक विकासाचे नवे कीíतमान प्रस्थापित केले. तियानमेनच्या घटनेची ही अनपेक्षित परिणती समजून घेण्यासाठी त्या आंदोलनाच्या खोलात जाणे आवश्यक आहे.
सन १९८९ मध्ये बीजिंग शहरातील विद्यार्थी व तरुण वर्ग आíथक सुधारणांच्या प्रक्रियेतून उत्पन्न भ्रष्टाचाराने ग्रस्त होत साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वाकडे फिर्याद मागत होता. त्यांच्या मते लोकशाहीच्या अभावामुळे चीनमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असून सरकारने भ्रष्ट नेते व अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा करीत राजकीय सुधारणांचा बिगुल वाजवण्याची वेळ आली आहे. या राजकीय सुधारणा म्हणजे नेमके काय, याबाबत त्यांच्याकडे स्पष्ट मसुदा नव्हता. बहुतांश विद्यार्थ्यांना साम्यवादी पक्षाच्या वर्चस्वातच सुधारणा घडणे अपेक्षित होते, तर काहींना पाश्चिमात्य लोकशाही प्रणाली अपेक्षित होती. राजकीय सुधारणांच्या मागणीने नव्याने तयार झालेला मध्यम वर्ग, ज्यामध्ये उद्योजक, तंत्रज्ञ, व्यापारी आदींचा समावेश होतो, तियानमेनकडे आकर्षति झाला. याशिवाय, आíथक सुधारणांनी त्रस्त झालेला औद्योगिक कामगार वर्ग सरकारदरबारी मागण्या मांडण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाला. तियानमेन आंदोलनातील या तीन प्रमुख घटकांपकी मध्यम वर्गाला आíथक सुधारणांचा वेग वाढवत राजकीय सुधारणांची सुरुवात करायची होती. कामगार वर्गाचा मुख्य उद्देश आíथक सुधारणांना विरोध करणे होता. विद्यार्थी वर्गाची आíथक सुधारणांवर ठोस भूमिका नव्हती, मात्र भ्रष्टाचार त्यांच्या काळजीचा विषय होता. ग्रामीण भागातील जनता या आंदोलनाशी जवळपास फटकून होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दशकभराच्या आíथक सुधारणांनी, विशेषत: शेती क्षेत्रातील सुधारणांनी, ग्रामीण भागात प्रगतीचे वारे जोमात वाहू लागले होते. माओकालीन अर्थव्यवस्थेला कंटाळलेल्या ग्रामस्थांना आता राजकीय अस्थिरता नको होती आणि त्यांनी संपूर्ण लक्ष आíथक विकासावर केंद्रित केले होते. अशा विरोधाभासाने भरलेल्या आंदोलनाशी सरकारने सुमारे महिनाभर विविध मार्गानी चर्चा केल्या, पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्या फिस्कटल्या. अखेर साम्यवादी पक्षात प्रदीर्घ खलबते घडल्यानंतर लष्कराच्या मदतीने तियानमेन चौक ‘क्लियर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तियानमेनच्या घटनेचे चीनच्या राजकीय व समाजजीवनावर दीर्घकालीन पडसाद उमटले. या घटनेनंतर डेंग शियोिपगचा ‘साम्यवादी पक्षाच्या नेतृत्वात आíथक सुधारणा’ हा मूलमंत्र बळकट झाला. तियानमेनच्या घटनेचा आíथक सुधारणांवर परिणाम होऊ न दिल्याने डेंग हा सुधारणावाद्यांसाठी निर्वविाद नेता ठरला. दुसरीकडे, तियानमेन आंदोलनाने साम्यवादी पक्षाची पकड ढिली न होऊ देण्याच्या डेंगच्या कृतीने पक्षातील डाव्या गटाची तोंडे बंद झाली. तियानमेन घटनेनंतर चिनी समाजाने, मुख्यत: आíथक सुधारणांच्या लाभार्थ्यांनी, राजकीय सुधारणांऐवजी स्वत:ची भौतिक स्थिती बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले. साम्यवादी राजवटीला विरोध म्हणजे प्रदीर्घ काळासाठी अराजकाला आमंत्रण हा संदेश मध्यम वर्गाला मिळाला. परिणामी, तियानमेन घटनेनंतरचा जवळपास तीन दशकांचा कालखंड हा चीनमधील मागील दोन शतकांतील सर्वाधिक राजकीय स्थर्याचा कालावधी ठरला आहे.
साहजिकच, साम्यवादी पक्षाने ४ जून १९८९ च्या कारवाईचे आजवर समर्थनच केले आहे. शिवाय, तशी परिस्थिती पुन्हा उत्पन्न होऊ नये याची साम्यवादी पक्षातर्फे सातत्याने काळजी घेतली जाते. दुसरीकडे, चिनी समाजाने तियानमेनमधून धडा घेत विरोध-प्रदर्शनांचे विकेंद्रीकरण आणि अराजकियीकरण केले आहे. साम्यवादी पक्षाच्या एकछत्री स्वरूपाला तसेच सर्वोच्च नेतृत्वाला आव्हान न देता स्थानिक मुद्दय़ांवर केंद्रित आंदोलनांचे नवे स्वरूप चीनमध्ये आकारास आले आहे.
एकंदरीत, सरकारतर्फे तियानमेनसदृश कारवाईचे भय सध्याच्या पिढीच्या मानसिकतेत रुजले आहे. दुसऱ्या बाजूला, साम्यवादी पक्षाला सन १९८९ प्रमाणे जनआंदोलन उभे राहण्याची भीती सातत्याने सतावत असते. या धाक आणि प्रतिधाकाच्या संतुलनातून आजच्या चीनमध्ये राजकीय स्थर्य नांदते आहे.

परिमल माया सुधाकर

June 6, 2016

Read this article published in Aksharnama on June 6, 2016

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger