गांधी हयात असेपर्यंत इतर सर्व त्यांच्यापुढे खुजे ठरले आणि नंतरही त्यांची उंची कुणाला गाठता आली नाही!

 

आजपासून (२ ऑक्टोबर २०१८) महात्मा गांधींचे १५० व्या जयंतीचे वर्ष सुरू होत आहे. सरकारी आणि गैर-सरकारी स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने हे वर्ष धुमधडाक्यात साजरे होणार यात शंका नाही. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी राहण्याचा मान केवळ गांधींनाच मिळाल्याने, किंवा तो टिकवून ठेवणे फक्त त्यांनाच जमल्याने, स्वातंत्र्यानंतरदेखील त्यांची मूल्ये, पद्धती आणि कृती सातत्याने चर्चेत राहिली आहे. यातून भारत म्हणजे गांधींचा देश हे समीकरणदेखील जागतिक स्तरावर रूढ झाले आहे.

गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्यांच्या चुका, त्यांचे जीवन-पद्धती संबंधीचे विचार इत्यादींचा उहापोह होणार. खरे तर, गांधींचे जीवन आणि विचार याविषयी नव्याने मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ अट्टाहासापोटी चाकाचा नव्याने शोध लावण्याचा उपदव्याप करणे होय. गांधींच्या हत्येनंतर देशातील जवळपास सगळ्याच विचारसरणीच्या लोकांनी हळूहळू त्यांचे महात्म्य स्वीकारले. यात त्यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या विचारधारेचासुद्धा समावेश आहे. असे करताना गांधीचे व्यक्तित्व व आचार यांना थोरपण देण्यात आले, तर त्यांच्या विचारांकडे सोयीस्करपणे कानाडोळा करण्यात आला.

गांधींवर त्यांच्या हयातीत आणि नंतर तीन प्रकारची व्यापक टीका झाली आहे. काही विशिष्ट विचारसरणीच्या संघटनांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्द्यांकडे गांधींनी केलेले दुर्लक्ष किंवा तडजोडी हा यापैकी पहिला प्रकार आहे. यामध्ये, शेतमजूर व कामगारांच्या हितांकडे गांधींनी कानडोळा केल्याचा आरोप साम्यवाद्यांनी नेहमीच केला होता. दुसरीकडे, हिंदू महासभा आदी हिंदुत्ववादी संघटनांचा गांधींवरील राग हा त्यांनी हिंदू हितांशी तडजोड केली या समजुतीतून होता. या प्रकारच्या टीकेतून एक बाब स्पष्ट होते की, गांधींच्या कार्यकाळात सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. या संघटनांनी हे गृहीत धरलेले होते की, त्यांना अपेक्षित प्रश्नांवर जनजागृती करणे आणि लोक-आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर/प्रस्थापितांवर दबाव निर्माण करणे ही गांधींचीच जबाबदारी आहे. किंबहुना, गांधींनी ज्याप्रकारे जनमानसाची नाडी पकडली आहे, तसे करणे आपणास जमणार नाही, याची इतरांनी दिलेलीही अप्रत्यक्ष कबुली होती. त्यामुळे समांतर राष्ट्रीय आंदोलन उभारण्याऐवजी गांधींवर दबाव टाकून आपले मुद्दे मार्गी लावावेत, हा मार्ग इतर विचारधारांनी पत्करला होता.

गांधींवर होणारी दुसऱ्या प्रकारची टीका म्हणजे ‘स्वत: घोषित केलेल्या उद्दिष्टांबाबतही त्यांनी नेहमीच तडजोडीचे मार्ग स्वीकारले’ ही आहे. असहकार आंदोलन तसेच कायदेभंग आंदोलन मागे घेताना सरकारकडून अपेक्षित ते झोळीत पाडून घेण्यात आले नाही, अशा प्रकारची टीका त्यांच्यावर नेहमीच होते.

यात वस्तुत: सत्य असले तरी प्रत्येक लढाईकडे अंतिम युद्धाच्या भूमिकेतून बघितले जाण्यातून ही टीका उद्भवली आहे. संघटना उभारणी आणि आंदोलनांच्या माध्यमातून राजकीय विस्तार करत असताना कुठवर ताणायचे याचे भान सेनापतीला नेहमीच ठेवावे लागते. आंदोलन लवकर मागे घेतले गेल्यास ते नव्याने उभारता येते; पण आंदोलन भरकटल्यास किंवा सरकारी-यंत्रणेमार्फत संघटनेचे संपूर्ण दमन झाल्यास ते पुन्हा उभारणे अशक्यप्राय काम असते, याची गांधींना जाणीव होती. १८५७ च्या अपयशी ठरलेल्या स्वातंत्र्यलढ्यातून मिळालेल्या अनेक धड्यांपैकी हाही एक धडा होता.

गांधींवर होणारी तिसऱ्या प्रकारची टीका ही त्यांच्या मूळ विचारसरणीवर होणारी टीका आहे. याबाबतीत गांधींना चहूबाजूंनी विविध प्रकारच्या व वेगवेगळ्या वैचारिक बांधीलकीच्या टीकांना सामोरे जावे लागले. गांधींची विचारसरणी व कार्यपद्धती दलितांच्या समानतेच्या आंदोलनाविरुद्ध जाणारी असल्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने घेतली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात  डॉ. आंबेडकर हे असे एकमेव व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात काँग्रेस व गांधींकडून काहीही अपेक्षा ठेवल्या नाहीत आणि त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नांवर स्वत: जीवाचे रान केले. गांधींनी मात्र डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर कृतीशील भूमिका घेतली आणि काळानुरूप स्वातंत्र्य चळवळ सर्वसमावेश न झाल्यास होऊ शकणाऱ्या परिणामांची वेळीच दखल घेतली.

याचप्रमाणे मार्क्सवादी चळवळीने केलेल्या टीकेला उत्तर देताना गांधींनी अंत्योदयाची संकल्पना मांडली. गांधींनी भांडवलशाही व समाजवाद या तत्कालीन प्रबळ प्रवाहांबरोबर वाहत जाण्याऐवजी स्वत:ची रामराज्याची संकल्पना पुढे केली. असे करताना गांधींनी संपत्ती, केंद्रीकरण, शोषण आणि चंगळवाद या सर्वांविरुद्ध भूमिका घेतली. ज्याप्रमाणे त्यांनी डॉ. आंबेडकर आणि मार्क्सवादी चळवळीला कृतीशील व वैचारिक उत्तर दिले, तसेच त्यांनी हिंदुत्ववादी आणि मुस्लिम कट्टरपंथीयांपुढे सर्वधर्मसमभावाची संकल्पना ठेवली. हिंदुत्ववाद्यांसाठी त्यांचा सर्वधर्मसमभाव म्हणजे मुस्लिमांचा अनुनय करणे होते, तर गांधींनी वापरलेल्या ‘गीता’ व ‘रामराज्या’च्या प्रतीकांमुळे मुस्लिम कट्टरपंथ्यांनी त्यांना फक्त ‘हिंदूचा’ नेता ठरवले होते. सर्वच बाजूंनी वैचारिक विरोधक असतानादेखील गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनात केंद्रस्थान पटकावले होते. यामागील एकमेव कारण म्हणजे त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात कृतीशील कार्यक्रमातून जनतेचा सहभाग निर्माण करण्यात यश मिळवले होते.

दक्षिण आफ्रिकेतून परत येण्यापूर्वी भारतात विविध ठिकाणी सुरू असलेल्या वैचारिक मंथनाची त्यांना पूर्ण कल्पना होती. सर्वप्रथम, गांधींनी आधी सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य हा वाद त्या वादात न पडताच मिटवून टाकला. एकाच राष्ट्रीय आंदोलनाच्या माध्यमातून दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम दिले होते. राजाराम मोहन रॉय, केशवचंद्र सेन, न्यायमूर्ती रानडे इत्यादींनी रुजवलेल्या सामाजिक सुधारणांच्या मुद्द्यांना त्यांनी राष्ट्रीय आंदोलनाचा अभिन्न भाग बनवले. गांधींच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे स्वातंत्र्य आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला होता. ज्योतिबा फुल्यांनी सामाजिक पटलावर आणलेल्या विषमतेच्या मुद्यांची आणि डॉ. आंबेडकरांमुळे दलित समाजात येत असलेल्या जागृतीची गांधींना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात स्पृश्यास्पृश्यता मिटवण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले. गांधींनी केलेल्या या कामाची फळे स्वातंत्र्यानंतर पुढे कित्येक वर्षे काँग्रेस पक्षाने दलितांच्या मताच्या रूपाने चाखली.

काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळातील मवाळ गट व जहाल गटातील कार्यपद्धती संबंधीचे मतभेद त्यांनी सत्याग्रहाच्या माध्यमातून संपवले. काँग्रेस विरुद्ध इतर गटांमध्ये, सत्याग्रह की सशस्त्र लढा हा वाद शेवटपर्यंत सुरू होता, पण गांधींच्या आंदोलनातील जनसहभागाने सशस्त्र लढ्याचे समर्थक संख्येने नेहमी तुरळकच राहिलेत. आर्थिक मागण्यांच्या छोट्या-छोट्या ठिकाणी केलेल्या आंदोलनातून स्वातंत्र्याचे मोठे राष्ट्रीय आंदोलन उभारण्याची किमया त्यांनी साध्य केली. चंपारणचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबादच्या गिरण्यातील कामगारांचा संप, मीठावर लादलेल्या कराविरुद्धची दांडीयात्रा या सर्व आंदोलनांमध्ये जनसामान्यांच्या आर्थिक हलाखीला साद घालण्यात आली होती. त्याचप्रमाणे, भारतीय अर्थव्यवस्थेतील खेड्यांचे स्थान आणि शेतीचे महत्त्व यांना राष्ट्रीय आंदोलनाच्या केंद्रस्थानी आणण्याचे संपूर्ण श्रेय गांधींना जाते.

हिंदू-मुस्लिम प्रश्नाची तीव्रता आणि परिणामांबाबत गांधी सुरुवातीपासून चौकस होते. १९१६ मध्ये, लोकमान्य टिळक यांनी लखनौ इथे काँग्रेस व मुस्लिम लिग दरम्यान मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा करार घडवून आणण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजकारणात गांधींचे आगमन झाले होते. साहजिकच त्यांनी सुरुवातीपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. मात्र इतर बाबतीत जेवढे यश गांधींना मिळाले, तेवढे हिंदू-मुस्लिमांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यात मिळाले नाही. असे असले तरी या प्रश्नाला हात लावण्याचे त्यांनी टाळले नाही. उलट आयुष्यातील शेवटच्या काळात त्यांनी सर्वाधिक प्रयत्न हिंदू-मुस्लिमांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी केले. त्यांच्या प्रयत्नांनी फाळणी थांबली नाही, पण स्वतंत्र भारताची पायाभरणी एक धर्मनिरपेक्ष लोकशाही देश म्हणून झाली. सामाजिक जीवनात सर्वधर्मसमभाव आणि सरकारचा धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन या मूल्यांची जोपासना न केल्यास भारताचे आणखी तुकडे पडतील हे गांधींनी ओळखले होते आणि जनमानसावर तसे बिंबवले होते.

गांधींचे महात्म्य यात होते की, त्यांनी विविध विचारसरणीशी सतत संवाद सुरू ठेवला. गांधींच्या अनुषंगाने भारतीय समाजात चाललेल्या विचार-युद्धात भारतीय लोकशाहीची बीजे पेरल्या गेली. इतरांनी त्यांच्याकडून काही शिकले नाही तरी ते सर्वांकडून शिकत गेले. परिणामी, गांधी हयात असेपर्यंत इतर सर्व त्यांच्या पुढे खुजे ठरले आणि गांधींच्या हत्येनंतर त्यांची उंची कुणाला गाठता आली नाही.

सदर – सत्योत्तरी सत्यकाळ
परिमल माया सुधाकर
Tue , 02 October 2018

Read this article published in Aksharnama on Tue , 02 October 2018

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger