सनातनी, हिंदुत्व, हिंदू आणि भारतीयत्व

सन १९९६ मध्ये प्रा. डॉ. कांचा इलैय्या यांनी ‘Why I am not a Hindu?’ या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित केले होते. याच सुमारास आज भारतीय जनता पक्षाचे लोकसभा खासदार असलेले डॉ. उदित राज यांनी त्यांचे पूर्वीचे नाव डॉ. रामराज त्यागत शेकडो अनुयायांसह बुद्ध धर्मात प्रवेश केला होता. या दोघांनीही अगदी नवे असे काहीच केले नव्हते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या पायावर स्वत:चे कळस उभारायचे प्रयत्न केले होते. डॉ. आंबेडकरांनी सन १९३६ मध्येच घोषणा केली होती की, ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’ यानंतर दोन दशकांनी, म्हणजे सन १९५६ मध्ये, बाबासाहेबांनी लाखो दलितांना प्रेरित करत बुद्ध धर्म स्विकारला होता. यावेळी आपल्या अनुयायांना दिलेल्या २२ कलमी प्रतिज्ञेत डॉ. आंबेडकरांनी स्पष्टपणे वदवून घेतले होते की, ‘ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण, गौरी, गणपती यांना मी देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही.’ यांत त्यांनी असेही म्हटले होते की,‘देवाने कुणाचा अवतार घेतला असे मी मानत नाही आणि गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार होते हा धादांत खोडसाळ प्रचार आहे.’

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यता आणि दलितांच्या शोषणाचे प्रश्न एरणीवर मांडण्याची सुरुवात केल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत एक मुद्दा सातत्याने अधोरेखित केला की, हिंदू धर्मातील जातीव्यवस्था ही अपघाताने विकसित झालेली नसून ही व्यवस्थाच या धर्माचा गाभा आहे. साहजिकच हिंदू धर्मातील पंडितांना ही बाब मान्य नव्हती. धर्म ग्रंथांमध्ये जे-जे लिहून ठेवले आहे, ते सनातन असून काळ व भूगोलाच्या मर्यादेपलीकडचे आहे, असे जे सर्वच धर्माच्या मौलवी-पाद्रींना वाटते, तसेच ते हिंदू धर्मपंडितांनादेखील वाटते.

हिंदू धर्मातील हा सनातनी प्रवाह असून या विरुद्धच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंड पुकारले होते. भविष्यात कांचा इलैय्यासारख्या विद्वानांनी आपल्या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच काम पुढे नेले. मात्र याच कांचा इलैय्या यांना काही वर्षे आधी नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा वेगळे वाटत होते आणि त्यांच्याकडून डॉ. इलैय्या यांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांनी एका लेखात असे म्हटले होते की, संघ चाणक्य असून नरेंद्र मोदी चंद्रगुप्त मौर्य आहेत आणि या आधुनिक चंद्रगुप्ताकडे चाणक्याचे मनुवादी वर्चस्व झिडकारून लावण्याची संधी चालून आली आहे. असाच काहीसा समज डॉ. उदित राज यांचादेखील झाला असावा, ज्यातून त्यांनी भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळवत थेट लोकसभेत प्रवेश केला.

कांचा इलैय्या यांना भ्रमित करणाऱ्या, उदित राजसारख्या अनेकांची बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या संघाच्या प्रभावाने व्यथित होत आज अनेक प्रतिष्ठित लोक स्वत:ला हिंदू घोषित करत भारतीय समाजातील ‘Good Hindu – Bad Hindu’ अशा विभागणीची उजळणी करत आहेत. ही मांडणीही नवीन नसून भारतात इंग्रजी राज्य प्रस्थापित झाल्यापासून ज्या अनेक सुधारणावादी चळवळी झाल्या, त्याच्या केंद्रस्थानी हीच भूमिका होती. वाईट हिंदू तो, जो पोथ्या-पुराणांचा फक्त स्वत:च्या सोयीने अर्थ लावतो आणि कोणत्याही सामाजिक बदलांसाठी तयार नसतो. याउलट चांगला हिंदू तो, जो काळानुरूप तर बदलतोच, शिवाय मूळ धर्म ग्रंथांचे आजच्या परिस्थितीनुरूप विवेचन करतो. म्हणजेच हिंदू धर्माला सातत्याने काळ सुसंगत बनवतो.

सनातनी हिंदूंना या ‘गुडीगुडी’ वागणाऱ्या हिंदूंचा राग येतो. कदाचित त्यांच्या दृष्टीने हा स्वत:ला चांगला मानणारा हिंदू ‘काफिर’ असतो. २० व्या शतकात या चांगल्या हिंदूंचे प्रतिनिधित्व खुद्द महात्मा गांधींनी केले. मात्र १९ व्या व २० व्या शतकात या दोन्ही प्रकारच्या हिंदूंवर इंग्रजांच्या ख्रिस्ती धर्माची छाप पडलेली दिसते. ज्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मात एक ईश्वर, एक धर्मग्रंथ आणि एकसमान उपासना पद्धती यांवर भर देण्यात आला आहे, त्याचे अनुकरण हिंदूंनी करावे असे सनातनी आणि चांगल्या हिंदूंना कमी-अधिक प्रमाणात वाटत आले आहे.

विशेष म्हणजे ख्रिस्ती धर्मीय इंग्रजांचे देशावर प्रभुत्व प्रस्थापित होण्याआधी भारतावर इस्लामच्या प्रभावातील राज्यकर्त्यांनी काही शतके राज्य केले होते. त्यावेळी हिंदूंमध्ये या प्रकारच्या ‘एकसमानतेची’ आकांक्षा उत्पन्न झाल्याचे इतिहासात कुठे दिसत नाही. इस्लाममध्येसुद्धा ख्रिस्ती धर्माप्रमाणे एक ईश्वर-एक धर्मग्रंथ-एक उपासना पद्धती याचा अतिरेक करण्यात आला आहे. मात्र अशा एकजिन्नसी इस्लामने प्रभावीत न होता ख्रिस्तीधर्मीय इंग्रजांच्या आगमनाने सनातनी हिंदूंना त्यांच्यासारखेच होण्याची प्रेरणा मिळावी आणि चांगल्या हिंदूंना सनातनी नसल्याची जाणीव व्हावी हे आश्चर्यच होते! असे घडण्यामागचे मुख्य कारण ख्रिस्ती धर्मात नव्हते तर इंग्रजांनी आत्मसात केलेल्या भौतिक ज्ञानात आणि त्यातून प्राप्त केलेल्या जागतिक लौकिकात होते. सनातनींपैकी अनेकांना हे कधी कळलेच नाही. पण काही सनातनींना जसे हे कळले, तसे अनेकानेक चांगल्या हिंदूंनासुद्धा जाणवले!

यातून धडा घेत चांगल्या हिंदूंनी धार्मिकतेच्या कक्षा ओलांडत भारतीयत्वाची मांडणी सुरू केली. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी आपापल्या परीने भारत व भारतीयत्वाची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला. या भारतीयत्वात धार्मिक सुधारणांबाबत उदार दृष्टिकोन, विज्ञानवाद आणि राष्ट्र-राज्यात इतर धर्मियांना समान स्थान व सहिष्णू वागणूक या तत्त्वांना महत्त्व देण्यात आले.

ज्या सनातनी हिंदूंना इंग्रजांची आधुनिकता कळली ते हिंदुत्वाकडे वळले. त्यांनी विज्ञानाचे महत्त्व शक्ती-संपादनापुरते आत्मसात केले. त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही संकल्पना मांडली. या संकल्पनेत हिंदूंना श्रेष्ठत्व आणि इतर धर्मियांना कनिष्ठत्व देण्यात आले. हिंदू तेवढे देशाचे संपूर्ण नागरिक असतील आणि इतरांना देश-निकाला अथवा दुय्यम नागरिकत्व मिळेल असे ठासून मांडण्यात आले. त्यांच्या दुर्दैवाने राष्ट्रीयत्वाची ही संकल्पना भारताच्या राज्यघटना समितीने धुडकावून लावली आणि चांगल्या हिंदूंनी डॉ. आंबेडकरांशी युती करत आपली भारतीयत्वाची संकल्पना राज्यघटनेद्वारे अंमलात आणली. हिंदुत्वाच्या संकल्पनेत हिंदू राष्ट्राची धारणा जेवढी स्पष्ट आहे, तेवढीच संदिग्धता धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळगण्यात आली. हिंदू धर्मातील सुधारणांवर टिप्पणी करण्याऐवजी त्या सुधारांना इतर धर्मातील सुधारणांशी जोडण्यात आले. ते बदलले तर आम्ही बदलू, ते सुधारलेत तर आम्ही सुधरू हा बाणा दिवसेंदिवस ताठ होत गेला. यामुळे एकतर हिंदू धर्मातील सुधारणांना, विशेषत: जाती निर्मूलनाच्या कार्याला, खीळ बसली.

याशिवाय, चांगल्या हिंदूना सुधारणावादी भूमिका घेण्यात लाज वाटावी असे वातावरण जसे हळूहळू पसरवण्यात आले, तसे वेगाने सुधारणावादी नामशेष होऊ लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर दलित चळवळ सत्तेच्या रिंगणात अडकल्याने सुधारणावादी हिंदूंनादेखील धार्मिक सुधार व जाती-अंताची लढाई लढण्याची आवश्यकता उरली नाही असे वाटू लागले.

या सर्वांचा सर्वांत भीषण परिणाम झाला तो ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असे चित्र समाजात उभे करण्यात हिंदुत्ववादी यशस्वी झाले. आपण सगळे ते हिंदू आणि इतर ‘ते’ परधर्मीय अशी समाजाची सरळसोट विभागणी करत जो-जो आमच्यातला हिंदू नाही तो-तो ‘त्यांच्या’ आहे अशी सामाजिक मानसिकता तयार करण्यात आली.

ही मानसिकता एवढी प्रबळ झाली की स्वत:ला चांगले हिंदू मानत सनातनी विचारांऐवजी आधुनिकतावादाला किंचित का होईना प्राधान्य देणाऱ्या मध्यम वर्गापासून ते डॉ. उदित राजसारख्या धर्म परिवर्तन करणाऱ्या नेत्याने हिंदुत्वाला जवळ केले. सनातनी हिंदू व हिंदुत्व यांच्यात फारसा संघर्ष कुठे नव्हताच. त्यामुळे त्यांची साहजिक सरमिसळ आजच्या राजकारणात झाली. यातून एकीकडे हिंदूमधील कुप्रथांवर, जाती व्यवस्थेवर बोलणे अशक्य झाले आहे आणि त्यातही बोलणारे दाभोळकर-पानसरे—कुलबर्गी-लंकेश होत आहेत. दुसरीकडे, हिंदुत्वाच्या टोळधाड्यांकडून इतर धर्मियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल ‘ब्र’सुद्धा काढला की, त्यांना ‘देशद्रोही’ ते ‘शहरी नक्षली’ ठरवण्यात येत आहे.

अशा या वातावरणात ज्या चांगल्या हिंदूंची घुसमट होते आहे, त्यांनी आता भूमिका घेण्याची गरज आहे. तशी ती घेण्यातही येत आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ‘Why I am a Hindu’ नावाचे पुस्तक लिहीत भारताचा सहिष्णू इतिहास साकारला आहे आणि हिंदू असणे व हिंदुत्वाला मानणे यातील फरक अधोरेखित केला आहे.

हिंदू असणे हे धार्मिक आणि/किंवा आध्यात्मिक आहे, तर हिंदुत्व ही फक्त राजकीय संकल्पना आहे. याचप्रमाणे मराठी नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांनीसुद्धा ‘मी हिंदू आहे’ असा लेख लिहीत हिंदुत्ववादाला शिंगावर घेतले आहे. मात्र असे करत असताना जोवर जाती निर्मूलन व स्त्री-मुक्ती या संकल्पनांना बळ देण्यात येणार नाही, तोवर चांगल्या हिंदूंद्वारे हिंदुत्वाचा पराभव होणार नाही. त्याचप्रमाणे, जोवर दलित आंदोलन ‘हिंदुत्व’ आणि ‘चांगले हिंदू’ यांच्यातील फरक ध्यानात घेणार नाही, तोवर सनातनी हिंदूंचेच फावणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार हेच अपेक्षित आहे का?

संकीर्ण – पुनर्वाचन
परिमल माया सुधाकर
Tue , 23 April 2019

सदर,सत्योत्तरी सत्यकाळ,परिमल माया सुधाकर,Parimal Maya Sudhakar,व्हाय आय अॅम नॉट अ हिंदू,Why I am Not a Hindu,कांचा इलैय्या,Kancha Ilaiah,व्हाय आय अॅम अ हिंदू,Why I am a Hindu,शशी थरुर,Shashi Tharoor,अतुल पेठे,Pethe Atul

Read this article published in Aksharnama on Tue , 23 April 2019

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger